चला थोडं आठवणीत रमू....
तस मागे वळून पाहिलं की खूपदा आठवणी आपल्याला बोलवताना दिसतात, आता या तिच्या आठवणी नाहीयत, पण नक्कीच आपल्या सर्वांच्या आठवणी आहेत. कधीतरी एकांतात अस मागे वळून, मनाच्या डोहात आतवर जाऊन प्रत्येकाने ती आठवणींचे शिंपले नक्की उघडून पाहावेत. आजही आठवत मला जेंव्हा हाफ पॅन्ट घालून आम्ही सगळे शाळेत जायचो, बेंच वर रेषा मारून आपआपल्या हिस्स्यावर मालकी गाजवायचो. चालू तासाला जलजीरा चाटायला जी मजा यायची ती महागातल्या कॅफेत सुद्धा मिळणार नाही. शाळा सुटली का उनाड भटकत फिरायच, कडक ऊन असलं की एखाद्या मित्राच्या घरी निवांत झोपायच. आणि हो ते पत्र्यावर चढून टीव्हीचा अँटेना ठीक करणं एक साहसी काम असायचं. काळ्या पांढऱ्या पटावर येणाऱ्या मुंग्या मात्र खडू मारून सुद्धा जायच्या नाहीत, कुरापती करून कधी कधी दुसऱ्याच्या केबल चे चॅनेल मात्र ढापता यायचे. आधी पत्रात मस्त गोड गोड पापे मिळायचे, रक्षाबंधनला राखी सोबत साखरेचे कणही चिटकून यायचे. कधी फोन आलाच कुणाचा तर शेजारच्या काकू कडे यायचा, नाहीतर STD मधून किंमत देऊन लावायचा. आम्ही आहोत त्या जमान्यात जन्मलेले ज्याने मोबाइल फोनची पूर्ण उत्क्रांती बघितलीय, काळ्या पांढऱ...